NPS: एनपीएस योजना म्हणजे काय?

प्रत्येकजण उत्पन्न चालू झाल्यावर गुंतवणुकीच्या माध्यमातून बचत करण्यासाठी किंवा चांगल्या परताव्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक घटकांना प्राधान्य देत असतो. यापैकी सर्वात महत्वाचे आणि हक्काचे पैसे जर आपणाला कोणत्या काळात लागत असतील किंवा ज्याची खरोखर गरज असेल तो काळ म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ होय. या काळासाठी पैशाची बचत करणे अपेक्षित आहे. फक्त बचत न करता ते चांगल्या ठिकाणी गुंतवणे ही काळाची गरज आहे. माझे बँकेत पैसे आहेत म्हणजे मी निवांत राहिले पाहिजे असे म्हणता येणार नाही. आपले उत्पन्न चालू झाल्याबरोबर निवृत्तीनंतरच्या जीवनाची गरज ओळखून आर्थिक पुंजी योग्य माध्यमातून जमा करणे गरजेचे आहे. नॅशनल पेन्शन स्कीम किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक चांगली योजना आहे. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी पेन्शन स्वरूपात परतावा देण्यासाठी या योजनेमध्ये बरेच लोक गुंतवणूक करत आहेत. सुरुवातीला ही योजना सरकारी कर्मचारी यांच्यापुरतीच मर्यादित होती, परंतु आता त्याची व्याप्ती वाढली असून कोणत्याही व्यक्तीला खाते एनपीएस खाते उघडून या योजनेमध्ये सहभागी होता येते.

2005 नंतर सरकारी सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस योजना लागू झाली होती. या योजनेने जुन्या पेन्शन योजनेची जागा घेतली. आता तर ही योजना सर्वांना खुली असल्यामुळे निवृत्तीनंतरची आधार देणारी काठी म्हणून या योजनेकडे पाहायला हरकत नाही. या योजनेचे स्वरूप कसे आहे ते आपण पाहूया.

ही योजना काय आहे?

पेन्शन फंड रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी(पीएफआरडीए) या नियामक मंडळाच्या व्यवस्थापनाखाली निवृत्तीनंतर पेन्शन अदा करण्यासाठी एनपीएस योजना कार्यान्वित केली आहे. बाजारामधील चांगल्या फंड व्यवस्थापकांना हेरून विविध पेन्शन फंड योजना अस्तित्वात आल्या आहेत. उदा एसबीआय पेन्शन फंड, एल आय सी पेन्शन फंड, एचडीएफसी फंड इत्यादी.

NPS Yojana Marathi

या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकते?

केवायसी अट पूर्ण करणारी देशातील 18 ते 65 वयोगटातील कोणतीही व्यक्ती एनपीएस या योजनेमध्ये सहभागी होऊ शकते. त्यासाठी शासकीय सेवेत असायलाच पाहिजे असे नाही.

या योजनेमध्ये कसे सहभागी होता येईल?

या योजनेसाठी सरकारी तसेच खासगी बँकांना खाते उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. बँकेत जाऊन एनपीएस फॉर्म भरता येईल. त्यासाठी ज्या बँकेमध्ये ह तुमचे खाते आहे तिथे ही सुविधा उपलब्ध आहे का ते पाहावे. ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी eNPS हा देखील चांगला पर्याय आहे.

एनपीएस खाते कसे काम करते?

सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे एनपीएस खात्याचे दोन उपप्रकार असतात. टायर 1 व  टायर 2. टायर 1 मध्ये जमा केलेली रक्कम निवृत्तीनंतरच मिळू शकते. टायर 2 मध्ये जमा होत असलेली रक्कम ऐच्छिक स्वरूपात असल्यामुळे त्यामधील पैसे केंव्हाही काढता येतात. टायर 2 खाते काढण्यासाठी टायर 1 खाते असणे आवश्यक आहे. टायर 1 मधील पैसे संकट समयी किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये काढता येऊ शकतात पण त्याची योग्य ती शहानिशा केली जाते. ते बंधन टायर 2 मधील खात्याला नाही. वर्षाला किमान एकदा तरी टायर 1 खात्यामध्ये पैसे टाकने बंधनकारक आहे. टायर 2 मध्ये मात्र अशी कोणतीही अट नाही. टायर 1 खाते हे चालू करताना कमीतकमी 500 रुपये भरून उघडता येते. टायर 2 ला हीच रक्कम एक हजार रुपये अशी आहे. एकदा तुमचे खाते उघडल्यावर तुम्हाला प्राण नंबर (परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर) दिला जातो, त्याला खाते क्रमांक म्हणायला हरकत नाही.

एनपीएसवरती कर सवलत मिळते का?

एनपीएस योजनेच्या टायर 1 खात्यावर 80C अंतर्गत दिड लाखाच्या गुंतवणुकी पर्यंत कर सवलत मिळते. यापुढे आणखी पन्नास हजार पर्यंत गुंतवणूक केल्यास 80 CCD(1B) अंतर्गत ज्यादा कर सवलत मिळते. टायर 2 वरील खात्यावर कोणतेही बंधन नसल्याकारणाने कर सवलत मिळत नाही.

निवृत्तीनंतर रक्कम कशा स्वरुपात मिळते?

तुम्ही गुंतवत असलेल्या रकमेवर निवृत्तीनंतर म्हणजेच वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर 60:40 या प्रमाणामध्ये ती रक्कम काढता येते. याचाच अर्थ तुम्ही गुंतवलेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम कर वजावट किंवा सवलत मिळवण्यास पात्र असेल. उर्वरित चाळीस टक्के रक्कम ऍन्युईटीमध्ये किंवा पेन्शन योजनेमध्ये गुंतवावी लागेल. ऍन्युईटीमध्ये गुंतवलेल्या पेन्शन स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नावर मात्र तुम्हाला स्लॅबप्रमाणे कर दयावा लागेल.

काही सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या NPS पेन्शन फंड योजना

  • SBI Pension Fund
  • LIC Pensio Fund
  • Kotak Pension fund
  • ICICI Prudential Pension Fund

Leave a Comment