वाहन कर्ज घेताना कोणती काळजी घ्याल?

आज-काल प्रत्येकाच्या घरी एक छोटीशी गाडी किंवा वाहन असणे गरजेचे बनले आहे. सार्वजनिक सेवा अचानक बंद पडल्यास अडचणीच्या काळात आपल्याला मदत करणारा घटक म्हणून आपल्या स्वतःच्या  गाडीकडे पाहावे लागते. गाडी असेल तर ठीक नाहीतर किमान भाड्याच्या गाडीने प्रवास करावा लागू शकतो, अशा वेळेस आपणाला स्वतःच्या हक्काच्या गाडीची उणीव भासू शकते. अशावेळेस घाई गडबडी मध्ये वाहन घेण्याचा विचार डोक्यात येऊ शकतो. एकरकमी पैसे असतील तर ठीक नाहीतर वाहन कर्ज घेण्याकडे अनेकांचा कल असू शकतो. कार 24 ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात पाच पैकी तीन लोक वाहन कर्जाला प्राधान्य देत आहेत असे आढळून आले आहे. सर्वसामान्य कुटुंबामध्ये वाहन घेण्यासाठी चार चाकी गाडी किंवा कारला प्राधान्य दिले जाते म्हणून अशावेळेस आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहूया.

वाहनाची गरज

आपण नेमके कोणत्या प्रकारचे वाहन घेणार आहोत हे ठरवले पाहिजे. दुचाकी ही संकल्पना मागे पडली असून चार चाकी वाहन घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. मोठे कुटुंब असेल तर एसयूव्हीसारख्या गाड्या घ्यायला हरकत नाही. पण छोटे कुटुंब असल्यास शक्यतो बजेट कारलाच प्रधान्य द्यावे. काही लोक व्यवसायिक कारणासाठी गाड्या घेतात. त्यांचा मूळ हेतू व्यवसाय करणे किंवा त्यातून नफा कमावणे हा असू शकतो, याउलट घरगुती कुटुंबासाठी किंवा आठवड्याच्या शेवटी फिरायला जाण्यासाठी वाहन घेणे गरजेचे पडू शकते. भारतामध्ये या प्रकारामध्ये मोडणारा वर्ग म्हणजे मध्यमवर्गीय वर्ग होय. आज-काल वाहन घेणे फक्त गरजेचे नसून अत्यावश्यक बनले आहे. बँकासुद्धा अगदी सोयीस्करपणे कर्ज देताना आढळून येतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे वाहन घेतल्यानंतर त्याचा वापर शक्यतो गरजेपुरताच असू शकतो. गाडीची किंमत किंवा घसारा होण्याचे प्रमाण वाढत असते. तेलाच्या किमतीसुद्धा त्याप्रमाणात वाढलेल्या आहेत कधीतरी चालवणार असाल तर पेट्रोल गाडीचा विचार करायला हरकत नाही.

कोणत्या गाडीला प्राधान्य द्यावे? जुनी की नवी?

राष्ट्रीयकृत बँका जुन्या गाडीला ती पाच वर्ष जुनी असेल तरच कर्ज देण्याचा विचार करतात. खाजगी आणि इतर बँका या अटी शिथिल करू शकतात. काही बँका आठ ते दहा वर्ष जुन्या वाहनांना कर्जे देतात. आपण नव्या गाडीला प्राधान्य दिल्यास कोणत्याही बँकेतून कर्ज घेणे सोपे पडते. वाहनाबद्दल जास्त माहिती नसल्यास किंवा बजेट कार घेणार असाल तर नवीनच गाडी घेणे फायद्याचे ठरू शकते.

एकदा कोणती गाडी घ्यायची आहे असे ठरवल्यास त्या कंपनीची अधिकृत माध्यमे किंवा त्यांच्या शोरूमला भेट देता येईल. नव्या गाडीसाठी किंमतीमध्ये जितकी घासाघीस कराल तितके कर्ज घेताना फायद्याचे ठरेल. वाहनाचा विमा व इतर कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत त्यानंतरच करारपत्र करावे. वाहन कर्ज घेणार असल्यामुळे शोरूममध्ये काही नव्या ऑफर्स आहेत का याची चौकशी करावी. काही वेळेस शोरुममध्ये दिल्या जाणाऱ्या ऑफर्स या गरजेच्या नसतात, त्यामुळे विनाकारण खर्च अंगावर ओढवून घेणे टाळावे. आपण वाहन कर्ज घेणार आहोत याची जाणीव ठेवावी.

कोणत्या बँकेची निवड कराल?

बाजारामध्ये बऱ्याच वित्तीय संस्था कर्ज देताना पाहायला मिळतात. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत. आपण मात्र शक्यतो राष्ट्रीयकृत बँकांनाच प्राधान्य द्यायला हवे, जेणेकरून व्याजदरातील सवलतीचा लाभ घेता येईल व प्रीपेमेंट करण्यासंबंधी कोणतेही इतर शुल्क लागू होणार नाही. एकदा बँकेला प्राधान्य दिल्यावर किंवा कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे हे ठरवल्यावर व्याजदराची तुलना करावी. त्याबरोबरच इतर कोणते छुपे शुल्क आहेत का याची खात्री करावी. काही बँका वेळेअगोदर कर्ज फेडण्यास शुल्क आकारतात, त्यासाठी कर्ज घेतानाच आपण दक्षता बाळगली पाहिजे.

सिबिल स्कोअर तपासणे

तुमचा सिबिल स्कोर कसा आहे याच्यावर तुमचे वाहन कर्ज अवलंबून आहे. अगदी पहिल्यांदाच कर्ज घेणार असाल तर सिबिल स्कोर सुधारण्याची ही नामी संधी असू शकते. या अगोदर छोटे मोठे कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड कशी झाली आहे यावरती तुमचा सिबिल स्कोर अवलंबून आहे. एखादे कर्ज थकीत असेल तर बँका तुम्हाला वाहन कर्ज देण्यास नकार देऊ शकतात ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे.

कर्ज फेडण्याचा कालावधी

वाहन कर्ज घेताना काही बँका तीन ते सात वर्षे परतफेडीसाठी कालावधी देऊ शकतात नव्या वाहनासाठी हा कालावधी दहा वर्षापर्यंत जाऊ शकतो. हे ठरवण्याचे अधिकार ग्राहकाला देण्यात आलेले आहेत. अर्थात, वेगवेगळ्या बँकांचा नियम वेगवेगळा असू शकतो त्याची खात्री सुरुवातीलाच करणे गरजेचे आहे. कर्ज भरण्याचा किंवा कर्ज परतफेडीचा कालावधी वाढल्यावर हप्ता कमी बसत असला तरी आपली ज्यादा रक्कम व्याजासकट जाते हे समजणे गरजेचे आहे. आपण किती कर्ज घेणार आहोत याची चाचपणी सुरुवातीलाच केलेली बरी, अन्यथा अनावश्यक व्याजाचा फटका बसू शकतो. वाहन घेतल्यानंतर त्याची निगा राखणे हेही आपले कर्तव्य आहे.

निष्कर्ष

सध्या इलेक्ट्रिक कार रस्त्यावरती धावत आहेत. सरकार, बँका आणि कार कंपन्यासुद्धा विविध ऑफर्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनाना प्रोत्साहन देत आहेत. मिळणाऱ्या सवलती चांगल्या असल्या तरी वाहन उद्योगासाठी आणि सर्वसामान्य वर्गात अंगवळणी पडण्यास थोडा आणखी कालावधी जाईल. त्यातील सुविधा, देखभाल खर्च, उपकरणांची उपलब्धता आणि सुलभता पाहूनच वाहन खरेदी व कर्जास प्राधान्य द्यावे.

वरील टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर वाहन कर्ज घेताना कोणताही गोंधळ उडणार नाही आणि आपल्या स्वप्नातले वाहन आपल्या दारात येईल व त्याचा आपणाला आनंद घेता येईल.

Leave a Comment