म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही प्रकारात गुंतवणूक करण्यापूर्वी बऱ्याच घटकांची माहिती आपल्याला माहीत असेलच असे नाही. सुदैवाने ऑनलाईन ज्ञान भांडारात आपल्याला माहिती घेण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. मराठीमध्ये हा आकडा कमी असला तरी म्युच्युअल फंडाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यातील संकल्पना सोप्या भाषेत समजून घेणे अपेक्षित आहे. त्यापैकीच एक म्हणजे Active आणि Passive म्युच्युअल फंड होय. म्युच्युअल फंडातील जोखीम लक्षात घेता त्यातील परताव्याची हमी कोणतीही योजना देत नाही त्यामुळेच त्याचे विविध प्रकार आढळतात.
Active म्युच्युअल फंड
नावाप्रमाणेच Active म्युच्युअल फंड सक्रिय गुंतवणुकीसाठी ओळखले जातात. जेंव्हा फंड व्यवस्थापक त्याच्या स्वतंत्र निर्णयाने फंडमधील गुंतवणूक कोठे करायची हे ठरवतो तेंव्हा त्याला Active म्युच्युअल फंड म्हंटले जाते. सहसा व्यवस्थापक म्युच्युअल फंडमधील स्टॉक किंवा इतर गुंतवणूक त्याच्या कौशल्याने खरेदी, विक्री अथवा स्थिर ठेवत असतो म्हणूनच त्याला सक्रिय व्यवस्थापक म्हणतात. व्यवस्थापक नेहमी इंडेक्स आणि बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा देण्यासाठी प्रयत्नशील असतात. उदा. इंडेक्स 10% परतावा देत असेल तर फंड व्यवस्थापकाने सक्रिय हालचाली करून त्याच्या फंडची कामगिरी 12% परताव्यामध्ये केली तर इंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी झाली असे समजले जाते. म्हणूनच Active म्युच्युअल फंड हे जास्त प्रचलित आहेत.
काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे;
- स्टॉकची निवड करणे, त्या स्टॉकची विक्री करणे हे सर्व फंड व्यवस्थापकाच्या हातात असते.
- बाजारातील सूक्ष्म हालचालींचा अभ्यास करून हवे तसे बदल करून फंडामध्ये कमीत कमी त्रुटी कशा राहतील याचा नियमित मागोवा घेतला जातो.
- फंडाचा प्रकार कसा आहे त्यानुसार प्रत्येक फंड व्यवस्थापकाच्या वेगवेगळ्या योजना असू शकतात.
- फंडमध्ये विविधता आणण्यासाठी एक किंवा त्याहून जास्त व्यवस्थापक म्युच्युअल फंड हाताळत असतात. अनुभव आणि ज्ञानाचा वापर करणे हा त्यामागील उद्देश असतो.
सक्रिय किंवा Active म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी, डेट, हायब्रीड म्युच्युअल फंडाचा समावेश असतो.
Passive म्युच्युअल फंड
कोणत्याही फंडचे व्यवस्थापन एखादया इंडेक्सला किंवा बेंचमार्क यंत्रणेला आदर्श समजून केले जाते तेंव्हा त्या फंड प्रकाराला Passive म्युच्युअल फंड म्हंटले जाते. सहसा फंड व्यवस्थापक किंवा इतर व्यक्ती Passive म्युच्युअल फंड सक्रियपणे हाताळत नसल्यामुळे यातील परतावा इंडेक्सचा मागोवा घेत असतो. उदा इंडेक्सचा परतावा 10% असल्यास Passive म्युच्युअल फंडचा परतावासुद्धा 10% च्या आसपास राहील कारण Passive फंडाने इंडेक्सला फॉलो केले होते.
काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे;
- Passive म्युच्युअल फंडामध्ये फंड व्यवस्थापकाची भूमिका मर्यादित असते. फारसे स्वातंत्र्य नसल्यामुळे बेंचमार्क इंडेक्सने केलेल्या ट्रेडिंग हालचाली हुबेहूब फॉलो केल्या जातात.
- बेंचमार्क इंडेक्सने काही बदल केल्यास Passive म्युच्युअल फंड व्यवस्थापक त्याप्रमाणे बदल करून घेतात
- Passive म्युच्युअल फंड व्यवस्थापकाला बाजारातील घडामोडींचा अभ्यास करण्याची गरज भासत नाही.
- गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला Passive म्युच्युअल फंडचा मागोवा घेणे सोपे असते. कारण, होणारे बदल इंडेक्सला फॉलो करत असतात.
Passive म्युच्युअल फंडांमध्ये इंडेक्स, ETF इत्यादी फंडांचा समावेश होतो.
निष्कर्ष
Active आणि Passive म्युच्युअल फंड प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या जोखीम क्षमतेवर काम करत असतात. Active म्युच्युअल फंड जास्त परतावा देण्यासाठी तितकीच जास्त जोखीम उचलत असतात. Passive म्युच्युअल फंड बचावात्मक आणि तुलनेने कमी जोखीम घेत असतात. फंड व्यवस्थापकाचा खरा कस Active म्युच्युअल फंड हाताळताना लागतो कारण त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते.
FAQ-नेहमी विचारले जाणारे प्रश्न
कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये जोखीम नसते?
Active आणि Passive म्युच्युअल फंड दोन्हींमध्ये जोखीम असतेच. जोखमीचे स्वरूप कमी जास्त होवू शकते, म्हणूनच mutual funds are subject to market risk असे नेहमी म्हंटले जाते.
Active आणि Passive म्युच्युअल फंडमध्ये कोणाचे शुल्क जास्त असते?
Active आणि Passive म्युच्युअल फंडमध्ये Active म्युच्युअल फंडाचे शुल्क जास्त असते. कारण, ट्रेडिंग हालचाली जास्त होत असतात.
Active आणि Passive म्युच्युअल फंडमध्ये कोणता फंड चांगला आहे?
Active आणि Passive म्युच्युअल फंड दोन्हींमध्ये गुंतवणूकदारांचे ध्येय काय आहे त्यानुसार त्याची गुणवत्ता ठरते. गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी कोणता फंड चांगला आहे हे सांगणे कठीण आहे.
Active मधून Passive मध्ये स्विच होता येते का?
कोणताही फंड किंवा म्युच्युअल फंड योजना स्विच होताना अगोदरच्या योजनेतून आपण बाहेर आलो असे समजले जाते आणि नव्या योजनेमध्ये प्रचलित दराने आपली गुंतवणूक सुरू होते. स्विच होणे म्हणजे एकातून बाहेर येणे व दुसऱ्या योजनेमध्ये प्रचलीत दराने प्रवेश करणे होय.