निवृत्तीनंतरची गुंतवणूक – Investment after Retirement

माणसाचे आयुष्य त्याच्या नोकरीभोवती किती वेळात निघून जाते हे समजत नाही. किंबहुना कुटुंबापेक्षा सर्वात जास्त वेळ हा त्याच्या कामकाजामध्ये निघून जातो. निवृत्तीनंतरची गुंतवणूक कोठे करावी हा अवघड प्रश्न त्याला  सारखा सतावत असतो. उद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्यांना निवृत्तीचे बंधन नाही. त्यांनी कोणत्या वेळी निवृत्ती पत्करली पाहिजे असे निश्चित सांगणारा काळ नाही. त्यांचे भविष्य वर्तवणे कठीण आहे. नोकरदाराच्या बाबतीत मात्र वयाची साठी गाठल्यास निवृत्त समजले जाते. कामकाजाच्या या संपूर्ण काळामध्ये जी काही बचत किंवा पुंजी साठली असल्यास निवृत्तीनंतर त्याचा लाभ भेटतो.

एखाद्याकडे भरपूर रक्कम आल्यास त्याला ती नेमकी कोठे गुंतवावी असा प्रश्न पडू शकतो. एकदा निवृत्त झाल्यास आपला खर्च कमी होईल असे गृहीत धरतो. पण असा कोणताही गैरसमज करून घेऊ नये, कारण भलेही प्रवासी किंवा इतर खर्च वाचत असला तरी निवृत्ती नंतरचा काळ जास्त उत्पन्नाची शाश्वती देत नाही. आरोग्याचा खर्च वाढण्याची शक्यता असते. पेन्शन किंवा तत्सम आधारावरती जीवन जगावे लागू शकते. काहींना तर पेन्शन हा विषय लागू होत नाही, त्यामुळे एकरकमी मिळालेल्या मुदतीचे काय करायचे हा प्रश्न पडू शकतो. अशा वेळेस गोंधळून न जाता महिन्याच्या महिन्याला उत्पन्नामध्ये चांगली भर कशी पडेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

काही महत्वपूर्ण गुंतवणुकीचे पर्याय

काहीजणांना एकदम पैसे आल्यावर संपत्ती घेण्याचे वेध लागतात पण त्याची खरोखरच गरज आहे का हे पाहणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतरची गुंतवणूक आपणाला साजेशी असल्यास व योग्य दिशा देणारा मार्ग माहिती असल्यास आपले जीवनमान चांगले राहण्यास मदत होते. त्यासाठी चांगले गुंतवणुकीचे पर्याय निवडणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

अलीकडे सर्वात जास्त प्रचलित असणारी व ज्येष्ठ नागरिकांना निश्चित स्वरूपाचा परतावा देणारी योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना होय. या योजनेमध्ये साठ वर्षाच्या पुढील निवृत्त झालेला किंवा 55 ते 60 व या दरम्यान स्वेच्छानिवृत्ती घेतलेला कोणताही जेष्ठ नागरिक पात्र असेल. तर हीच अट संरक्षण क्षेत्रामधून निवृत्त झालेल्या व्यक्तीस पन्नास वर्षे अशी आहे. भारतीय पोस्टमध्ये किंवा कोणत्याही सरकारी व इतर पात्र बँकांमध्ये या योजनेत गुंतवणूक करता येवू शकते.

गेल्या काही महिन्यातील ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर :

कधीपासून कोठेपर्यंत व्याजदर
01-07-2019 30-09-2019 8.60
01-10-2019 31-12-2019 8.60
01-01-2020 31-03-2020 8.60
01-04-2020 30-09-2020 7.40
01-10-2022 31-12-2022​​ 8.00
01-01-2023 31-03-2023 8.00

संदर्भ : इंडियन पोस्ट

डेट म्युच्युअल फंड मधील गुंतवणुक

निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीकडे डेट म्युच्युअल फंडकडे सकारात्मक दृष्टीने बघितले जाते. निवृत्तीनंतर इक्वीटी म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे, त्यामुळे डेट फंडलाच जास्त प्राधान्य द्यावे. अर्थात डेट फंडमध्ये काही जोखीम नाही असे नाही, इक्वीटी म्युचल फंडाच्या तुलनेत कमी जोखीम आहे. बाजारामध्ये बऱ्याच प्रचलित डेट योजना सक्रिय आहेत. स्वतःची जोखीम क्षमता पाहून गुंतवणूक करता येऊ शकते. निवृत्तीनंतर जास्त रक्कम आली असल्यास फंड मध्ये विविधता आणावी. जोखीम विभागून गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे.

कर बचत योजना

कर बचत योजनेमध्ये करबचत फंडांचा समावेश होतो. आपण निवृत्त झालो किंवा ज्येष्ठ नागरिक झालो म्हणून प्रत्येकवेळी वेगळी कर सवलत भेटेल असे नाही, त्या पद्धतीने योग्य ते पाऊल उचलून कर बचत योजनेमध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही.  हे करत असताना लॉकीन किंवा बंदिस्त कालावधी याचा जरूर अभ्यास करावा.

घर खरेदी करणे

बऱ्याचदा कामकाजाच्या सेवेत असताना किंवा नोकरीत असताना एकाच जागी काम करावे लागेल असे नाही. सुरुवातीला किंवा एकूणच नोकरीच्या कालावधीमध्ये घर घेण्याचे राहून गेल्यास आता त्याचा विचार करण्यास हरकत नाही, कारण निवृत्तीनंतर नोकरीच्या वेळेला जाणवत असणारी दगदग कमी होते. अशा वेळेस अगोदर राहतो त्या ठिकाणाहून दुसरीकडे किंवा थोडी दूर नवीन घर घेतल्यास बजेटमधील ताण किंवा भार हलका होऊ शकतो व आरामात जीवन जगता येऊ शकते. यासाठी उत्पन्नाचा ताळमेळ लावणे गरजेचे आहे. अन्यथा सर्वच रक्कम घरामध्ये गुंतल्यावर इतर खर्चासाठी काहीच शिल्लक उरणार नाही.

प्रधानमंत्री वय वंदन योजना

या योजनेमध्ये एकत्रित मिळालेली रक्कम गुंतवता येते. निवृत्त झालेले व वयाची साठ वर्षे पूर्ण केलेले सर्व लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात. एकप्रकारे ही योजना एण्युईटी किंवा पेन्शन योजनेसारखी काम करते. या योजनेमध्ये कमीत कमी एक हजाराची पेन्शन मिळू शकते. योजनेचा कालावधी दहा वर्षे असून पेन्शन स्वरूपात मिळणारी रक्कम ही एक महिना, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment