चांगला व्याजदर मिळवण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. विविध सरकारी योजना किंवा पोस्ट खात्यातील योजनेव्यतिरिक्त म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट, फ्लॅट इत्यादी योजना आपणाला चांगला परतावा मिळवून देऊ शकतात. आपणाला गरज असते ती फक्त योग्यवेळी योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची.
हल्ली बँकेमधील बचत खात्यावर मिळणारा व्याजदर अतिशय कमी असून महागाई बरोबर लढण्यासाठी तो पुरेसा आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तरुणांना त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करायला हरकत नाही, पण फक्त लोभस वाटणाऱ्या गुंतवणुकीला कमी कालावधीसाठी प्राधान्य देणे धोक्याचे ठरू शकते. अशा वेळेस सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजना कामी येऊ शकतात. चक्रवाढ व्याज दराचा फायदा हा मिळकत किंवा उत्पन्न चालू झाल्यावरच गुंतवणूक केल्यास मिळू शकतो. जितका गुंतवणुकीचा कालावधी जास्त तितका चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. यासाठी जेवढ्या लवकर गुंतवणूक चालू करता येईल तेवढ्या लवकर ती चालू केली पाहिजे. सर्वसाधारणपणे विमा आणि कर सवलती घेण्यापासून चालू होणारा प्रवास शेअर मार्केट व सोन्यामधील गुंतवणुकीपर्यंत येऊन थांबतो.
दिवस-रात्र फक्त गुंतवणुकीचा विचार करत बसण्यापेक्षा महिन्याच्या महिन्याला त्याची तरतूद करून ठेवल्यास भविष्यामध्ये चांगली आर्थिक पुंजी जमा होऊ शकते. त्यासाठी स्वतःचा पोर्टफोलिओ बनवणे गरजेचे आहे. मी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले म्हणजे माझी बचत झाली आहे असे म्हणायचे कारण नाही. त्यासाठी महागाईचा सामना करायला शिकले पाहिजे. पारंपारिक गुंतवणुकीला चिकटून राहण्यापेक्षा थोडीशी जोखीम क्षमता वाढवायला हरकत नाही.
सेव्हिंग बँक खाते
सर्वात जास्त सोयीस्कर वापरला जाणारा खात्याचा प्रकार म्हणजे सेविंग किंवा बचत खाते होय. यामध्ये हे दररोज व्याजदर मोजले जाते व तिमाहीच्या शेवटी खात्यामध्ये जमा होते. जास्त तरलता असलेले खाते म्हणून याकडे पाहिले जाते. सध्या सर्वात कमी व्याजदर याच बचत खात्यावरील रक्कमेवर मिळतो त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे ठेवणे सोयीस्कर नाही.
पोस्ट किंवा बँकेच्या मुदत ठेवी
एकेकाळी सर्वात जास्त व्याजदर देणाऱ्या योजना म्हणून मुदत ठेवी प्रसिद्ध होत्या. दर पाच वर्षांनी रक्कम दुप्पट होत असे. आता मात्र व्याजदरातील झालेला बदल किंवा अगोदर पेक्षा तुलनेने कमी झालेले व्याजदर या ठेवींना तितका परतावा देताना दिसून येत नाहीत. तरीही पारंपारिक गुंतवणूकदार या योजनेमध्ये पैसे गुंतवताना दिसून येतात. आपलीही थोडी रक्कम यामध्ये निश्चित स्वरूपाच्या परताव्यासाठी गुंतवणूक करायला हरकत नाही.
पीपीएफ किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना
कर बचतीसाठी गुंतवणूकदारांमध्ये पसंती असलेली योजना म्हणजे पीपीएफ होय. या योजनेमध्ये पंधरा वर्षासाठी पैसे टाकता येतात एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त 180000 पर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या पीपीएफचा व्याजदर मुदत ठेवी पेक्षा चांगला आहे. कर बचतीसाठीसुद्धा ही गुंतवणूक उपयोगी ठरते.
म्युच्युअल फंड्स
अलीकडे नवीन गुंतवणूकदारांमध्ये पसंतीस उतरलेला गुंतवणूक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड होय यामध्ये इक्विटी आणि आणि डेट तसेच काही इंडेक्स किंवा टॅक्स बचत योजनांचा समावेश होतो. जास्त कालावधीसाठी इक्विटी फंड चांगला परतावा देऊ शकतात. कमी कालावधीसाठी डेट फंड सतुलनेने कमी परतावा देत असले तरी ते कमी जोखमीचे ओळखले जातात. म्युच्युअल फंडस् मध्ये मिळणारा परतावा नेहमी जोखीम क्षमतेवर अवलंबून असतो. यामध्ये कोणत्याही निश्चित परताव्याची हमी नसते.
एनपीएस व इतर पेन्शन योजना
काही पेन्शन योजना म्युच्युअल फंडमधील पेन्शन योजनेवर आधारित असतात. निवृत्तीच्या काठीला हातभार म्हणून या योजनेकडे पहावयास हरकत नाही. इक्विटी फंड व डेट फंड यांचा मिलाफ करून या योजना वय व जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूकीचा दरवाजा उघडतात.
हेही वाचा – NPS: एनपीएस योजना म्हणजे काय?
सोने, घर व इतर संपत्तीमध्ये केलेली गुंतवणूक
सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक अडीअडचणीच्या काळामध्ये उपयोगाला येत असली तरी फारसे उत्पन्न मिळवून देईल असे नाही. घर किंवा जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा कमी तरलतेची असू शकते. सोने पटकन गहाण ठेवता येतात किंवा लगेच मोडता येतात. त्या तुलनेत घर व संपत्तीतील गुंतवणूक लगेच मोडता येत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
निष्कर्ष
गुंतवणूक करण्यापूर्वी दक्षता घेणे गरजेचे आहे. जसे छोट्या कालावधीसाठी आपली गुंतवणूक बचतीच्या दृष्टीने उपयोगी पडते, तसेच चांगला परतावा मिळवण्यासाठी किंवा महागाईला आव्हान देण्यासाठी जास्त कालावधीची गरज भासते हे आवर्जून नमूद करावे लागेल.