सेन्सेक्सची उसळी काय दर्शवते?

गेल्या चारही आढवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्सने विक्रमी नोंद केली. हा चढता आलेख भांडवली बाजारासाठी नवीन नसला तरी गेल्या काही दिवसांपासून इक्वीटी फंडांमध्ये कमी झालेली गुंतवणूक बघता बाजाराचा विरोधाभास सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. सेन्सेक्सने 64000 तर निफ्टीने 19000 चा आकडा पार करत गुंतवणूकदारांना खुश केले असले तरी परकीय बाजार निर्देशकांनी दाखवलेल्या आशादायी चित्राने भारतीय बाजारातील निर्देशांक किंचितसे फुगले आहेत हे मान्य करावेच लागेल.
सेन्सेक्स थोडीशी खालची पातळी गाठेल किंवा करेक्शन घेईल असा काही महिन्यांपासून अनेक तज्ञांचा अंदाज होता. सध्यातरी निर्देशांक पाहिल्यावर हा अंदाज फोल ठरताना दिसतोय असे वाटते. परदेशातील बरेच प्रतिष्ठित निर्देशांक काही दिवसापूर्वीच 52 आठवड्यातील सर्वात उंच पातळीवर स्थिरावले होते. आता त्याचेच पडसाद भारतीय भांडवली बाजारात उमटताना दिसत आहेत.

कोणत्या गोष्टींमुळे सेन्सेक्समध्ये उसळी?

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात BSE तील कंपन्यांचे बाजारमूल्य 294 लाखांपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले. डिसेंबर 2022 मध्ये हेच बाजारमूल्य 290 लाखाच्या आसपास होते. आता मात्र सात महिन्यानंतर BSE ने नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. युरोप आणि अमेरिकेच्या बाजारात तेजी येण्याचे कारण तेलाच्या किमती आवाक्यात आल्याने त्याची मागणी वाढेल व निर्यातीस चालना मिळेल असा एक सूर होता जो वास्तविक पाहता निर्यातीपेक्षा आयात करणाऱ्यांच्या फायद्याचा ठरेल असे वाटते. हीच परिस्थिती आशियातील टोकियो आणि हाँगकाँग बाजाराची आहे. तेथील निर्देशांकसुद्धा तेजीत दिसत आहेत.

FII आणि FPO गुंतवणूकदारांचा प्रवेश

वरती उल्लेख केल्याप्रमाणे परकीय गुंवणूकदारांनी दाखवलेला विश्वास आणि केलेली गुंतवणूक निर्देशांक हिरवे दाखवण्यास कारणीभूत होती. फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर म्हणजेच FIIs ने एकाच दिवशी जवळपास 2000 कोटीची इक्विटी गुंतवणूक केली जी खरोखरच भारतीय भांडवली बाजाराला हातभार लावणारी होती. एकीकडे रिटेल गुंतवणूकदार सावध पवित्रा घेताना दिसत होते व गुंतवणूक करण्यासाठी खालच्या स्थराची वाट पाहत होते तेवढ्यात FIIs ने दणका देत बाजाराला फक्त स्थिर न ठेवता तेजीत उसळी घ्यायला लावले. FPOs ने सुद्धा चांगली गुंतवणूक करत जूनमध्ये जवळपास 18000 कोटींची स्टॉक खरेदी केली.

किरकोळ महागाई दरात घट

रिटेल इन्फ्लेशन किंवा किरकोळ महागाई दर हा काही वर्षे सहा ते सात टक्क्यांपर्यंत राहिला होता जो रिझर्व्ह बँकेच्या उद्देशाला अजिबात दाद देत नव्हता. किरकोळ महागाई दर सामान्य लोकांच्या खर्चाशी जवळचा संबंध असलेला दर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र या दरामध्ये दिलासा मिळाला असून मार्चमध्ये 5.7% व एप्रिलमध्ये 4.7%, तर मे 2023 मध्ये तो 4.3% वर आल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साही वातावरण तयार झाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मॉनिटरी पॉलिसी सभेमध्ये किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट 4 टक्क्यांपर्यंत ठेवले होते जे सध्याच्या घडामोडी पाहता दृष्टिक्षेपात आल्याचे पहावयास मिळते.

रशिया – युक्रेन युद्धाचा परिणाम आणि चीनकडेही गुंतवणूकदारांची पाठ

मागील वर्षी रशिया – युक्रेन युद्धाचा परिणाम भांडवली बाजारात जाणवला असला तरी अनेक परकीय गुंतवणूकदारांनी याला संधी म्हणून विकसनशील राष्ट्रांकडे मोर्चा वळवला. चीनसारखे देशसुद्धा FIIs ना आकर्षित करण्यात कमी पडत असताना भारतीय बाजारात FIIs चा ओढा गुंतवणुकीच्या स्वरूपात चांगला राहिला. आशियातील बेंचमार्क भांडवली बाजार म्हणून चीनकडे पाहिले जाते, आता ती जागा भारतीय बाजाराने घ्यावी असे अनेक बाजार तज्ञांचे मत आहे. तशी भारतीय बाजारात संधीसुद्धा आहे.

भांडवली खर्चातील वाढ

सरकारने भांडवली खर्चात केलेल्या वाढीने अनेक घटकांना मागणी वाढली आहे. उत्पादन किंवा निर्माता क्षेत्राला यामुळे चालना मिळाली असून PMI निर्देशांक मजबूत स्थितीत पहावयास मिळत आहे. ऑक्टोबर 2020 नंतर तो सर्वाधिक अशा 58.7 पॉइंट पर्यंत आला आहे. (PMI म्हणजेच Purchasing Managers’ Index हा उद्योग जगतातील मागणी, खर्च, रोजगार, खरेदी – विक्री, निर्यात इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवून असतो). आर्थिक सुदृढतेच्या दृष्टीने ही वाटचाल खरोखरच आशादायी चित्र निर्माण करणारी आहे, म्हणूनच भारतीय भांडवली बाजारामध्ये तेजी दिसून आली.

बँकांची सर्वोत्कृष्ट कामगिरी

एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान आणि बँकांना भारतीय शेअर मार्केटचा कणा समजले जाते. बाजारातील जवळपास 60% वाटा या तिन्ही क्षेत्रानी व्यापला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत उंचावणारा आहे. बाजारात मंदीचे कितीही पडसाद उमटले तरी भारतीय बाजाराला सावरण्याचे काम हे तीन्ही क्षेत्रे करत आली आहेत. मध्यंतरी अदानी समुहाच्या प्रकरणामुळे चिंतेचे वातावरण पसरले होते तरीही भांडवली बाजाराने चांगली कामगिरी केली. बाजारातील गुंतवणूकदार बँकांची पत बघताना त्यातील बँकिंग आणि वित्तीय सेवा, बँक ताळेबंद, कर्ज वसुली, बँकांचे करार या गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. बँकांची लघु मध्यम उद्योगांना कर्जे देण्याची क्षमता वाढली असल्यामुळे पुरेसा क्रेडिट फायनान्स होताना दिसून येतोय. यामुळेच सेन्सेक्स चांगला प्रतिसाद देत बाजारासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

BSE वर गुंतवणूक नोंद करणाऱ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 24% वाढ झाली आहे. स्मॉल आणि मिडीयम भांडवली बाजारात जास्त तेजी दिसत असली तरी येणाऱ्या काही काळामध्ये हाच ट्रेंड राहण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. इक्विटीमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक रिटेल वर्गातील लोकांनी थोड्या फायद्याबरोबर SIP स्वरूपात stocks किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला हरकत नाही. हे करत असताना गुंतवणुकीचा कालावधी जास्त ठेवला तर जास्त फायदा या तत्त्वावर काम करत जोर द्यावा लागेल. बाजारातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवूनच हे साध्य होऊ शकते. भारतीय अर्थव्यवस्था विकासाला चालना देणारी असल्यामुळे जगातील प्रमुख उद्योग जगताचे लक्ष आपल्या व्यवस्थेकडे लागले आहे.

Leave a Comment