म्युच्युअल फंडातील NAV म्हणजे काय?

महत्वपूर्ण माहिती- म्युच्युअल फंडातील NAV म्हणजे काय?, व्याख्या, उदाहरण, गुंतवणूक आणि तुलना, निष्कर्ष इत्यादी.

बाजारातील त्या दिवशीचे व्यवहार बंद झाल्यानंतर म्युच्युअल फंडातील योजनेच्या एकूण बाजारमूल्य असलेल्या हिश्श्याला विभागून दिलेले युनिट्स म्हणजेच NAV किंवा त्याला म्युच्युअल फंडातील NAV-Net Asset Value असे म्हंटले जाते.

उदाहरण

एखाद्या म्युच्युअल फंडातील योजनेचे बाजारमूल्य एक कोटी आहे. समजा, त्या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 50 असेल आणि म्युच्युअल फंडाने सर्व गुंतवणूकदारांना प्रत्येकी 10 ₹ प्रमाणे 100000 युनिट्स वाटायचे ठरवल्यास त्या योजनेची NAV (1 कोटी/1 लाख) म्हणजेच 100 असेल. बाजारमूल्य वाढल्यास आपोआपच NAV सुद्धा वाढेल. याचाच अर्थ बाजारमूल्य कमी जास्त झाल्यास NAV सुद्धा कमी जास्त होत राहील.

एखाद्या शेअरचा भाव अगोदर काय होता आणि आता काय आहे यावर आपण त्यातील फायदा तोट्याचे गणित मांडत असतो. हीच परिस्थिती म्युच्युअल फंडातील योजनांनासुद्धा लागू होते. सहसा ट्रेडिंग बाजार बंद झाल्यानंतर सेबी नियमानुसार दिवसाच्या शेवटी NAV घोषित केले जातात ज्याची माहिती म्युच्युअल फंडातील योजनेच्या वेब संकेतस्थळावर उपलब्ध होते. सरासरी हा कालावधी 6 तासापासून 12 तासापर्यंत असू शकतो. त्यामुळेच, विविध ॲप्लिकेशन किंवा संकेतस्थळावर NAV दुसऱ्या दिवशी अद्यावत झालेला पहावयास मिळतो.

कॅम्सच्या (CAMS) अधिकृत ॲप्लिकेशनुसार एखाद्या म्युच्यअल फंडात जादा गुंतवणूक करायची असल्यास त्या दिवशीच्या पैसे ट्रान्स्फर करण्याचे माध्यम आणि कट ऑफच्या वेळेचा NAV खरेदी करताना विचार केला जातो. त्यासाठी खाली दिलेला आदर्श नमुना पाहा

 

What-is-Mutual-Fund-NAV-Marathi_CAMS_Timing_arthasampada

तुम्हाला माहीत आहे का?

जसे शेअरमध्ये ताबडतोब खरेदी करता येते तशी म्युच्युअल फंडातील योजनेची NAV ताबडतोब चालू ट्रेडिंगमध्ये खरेदी करता येत नाही. चालू ट्रेडिंगमध्ये कोणी खरेदी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला त्या दिवसाच्या ट्रेडिंग संपलेल्या मूल्याचे भाव विचारात घेतले जातात.

NAV जास्त असल्यास गुंतवणूक करावी का?

एखाद्या म्युच्युअल फंडातील योजनेची NAV जास्त आहे म्हणजे तो फंड चांगली कामगिरी करतोय असे समजण्याचे कारण नाही. बरेच लोक NAV जास्त म्हणजे परतावा जास्त अशा गैरसमजातून गुंतवणूक करतात, जे पूर्ण चुकीचे आहे. काही योजना एक दोन दशकांपासून अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांच्या NAV चे मूल्य जास्त दिसू शकते. NAV जास्त दिसल्यास बेंचमार्क इंडेक्सला मागे टाकले आहे असे सांगताना काहीजण आढळतात. अशा चुकीच्या माहितीवर आधारित गुंतवणूक करू नये. 90 च्या दशकात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला सुरुवात झाली त्यावेळी अगदी 10 रुपये NAV असलेल्या योजना आज 1000 रुपये NAV च्या घरात आहेत. याचाच अर्थ, त्या योजना पुरेशा अनुभवावर आधारित टिकाव धरून आहेत. त्यामुळे NAV हे गुंतवणुकीचे आधारभूत प्रतीक न समजता म्युच्युअल फंडातील योजनेच्या जोखीम क्षमतेवर आणि त्याच्या वार्षिक परताव्याचा निकष लावणे गरजेचे आहे.

म्युच्युअल फंडातील NAV- तुलनात्मक टेबल 

ABC फंड XYZ फंड
गुंतवणूक केलेली रक्कम 10000 10000
सध्याची NAV 1000 100
खरेदी केलेले युनिट्स 10 100
20 % NAV वाढ झाल्यास 1200 120
गुंतवणुकीचे बाजारमूल्य 12000 (1200 X 10 युनिट्स) 12000 (120 X 100 युनिट्स)
एखाद्या योजनेत दररोज NAV वाढत असेल आणि आपली गुंतवणूक त्याच म्युच्युअल फंडातील योजनेत असेल तर आपण त्याची तुलना करू शकतो. याउलट, कमी NAV असलेल्या योजनेची जास्त NAV असलेल्या योजनेशी तुलना करता येणार नाही, कारण प्रत्येक योजनेतील गुंतवणूक सुरू होण्याचा कालावधी वेगळा असू शकतो. तसेच वेगवेगळ्या म्युच्युअल फंडातील योजनेचे जोखीम व्यवस्थापन वेगळे असू शकते.

निष्कर्ष

म्युच्युअल फंड बाजारामध्ये अनेक विविध योजना आहेत. त्यापैकी आपल्या फायद्याची कोणती योजना आहे हे ठरवताना गुंतवणूकदारांचे पहिले लक्ष्य NAV कडे जाते. अर्थात, ते जरी स्वाभाविक असले तरी त्या फंडाची ऐतिहासिक कामगिरी, त्याचे बाजारातील अस्तित्व, संकटात टिकाव धरण्याची क्षमता, इत्यादी बाबी विचारात घेणे जरुरी आहे. इतकेच काय, त्या फंड हाऊसची प्रतिष्ठा, फंड व्यवस्थापक दर्जेदार असणे आवश्यक आहे. नुसते NAV बघून गुंतवणूक करणार असाल तर वरती उल्लेख केल्याप्रमाणे बाजारात दररोज अनेक योजना येत असतात, साहजिकच योजनेचे वय कमी असल्यामुळे NAV सुद्धा कमी असतो जो जास्त फायदा देईल असे समजण्याचे कारण नाही.

Leave a Comment