महत्वपूर्ण माहिती- विमा म्हणजे काय?, विम्याची गरज आणि महत्त्व..!, उदाहरण, विम्याबद्दल असलेले समज-गैरसमज, विम्याचे प्रकार संक्षिप्त स्वरूपात, निष्कर्ष इत्यादी.
आर्थिक जीवन सुरळीत चालू असताना आपणाला बऱ्याच गरजांची पूर्तता करावी लागते. नेहमी सरळ मार्गाने जगत असताना सामान्य माणसाच्या गरजा काही प्रमाणात वाढत असल्या तरी बचतीचे अनेक मार्ग खुले असल्या कारणाने वेळोवेळी त्याची सोय अथवा आर्थिक पूंजी साठवली जाईलच असे नाही. विमा हे असे अस्त्र आहे ज्याचे महत्व संकटात सापडल्यानंतर समजते जे दुर्दैवाने आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही माहितीचा प्रसार चांगला असूनही परिस्थिति तशीच आहे.
विम्याची गरज
भविष्यातील तरतुदी आव्हानात्मक वाटत असल्या तरी सामान्य लोक किंवा नोकरदार वर्ग पारंपारिक गुंतवणुकीला आजही प्राधान्य देताना दिसून येतात. मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादी गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. त्यानंतर काही लोक परदेश प्रवास, छंद इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात. या सर्व गोष्टी करत असताना आर्थिक बाजू बळकट असली पाहिजे असे मानणारा हा वर्ग अचानक येणाऱ्या संकटाना कसे सामोरे जातो हेही पाहणे महत्त्वाचे आहे. संकटे सांगून येत नसतात हे आपण नेहमी ऐकतो. ते खरेही आहे. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास कुटुंबावर येणारा आर्थिक ताण कितीतरी मोठा असू शकतो. त्यामध्ये जर करता पुरुष आजारी पडला तर मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशा संकटसमयी महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे विमा..!
कोणत्याही अनिश्चित संकटासाठी आपण तयार असले पाहिजे. जेमतेम कमावणारा नोकरदार असो किंवा श्रीमंत उद्योगपती, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागते ज्याचा पाया आर्थिक बाबींशी निगडित असतो. अशावेळेस आयुष्यामध्ये कमावलेली सर्व पूंजी रिकामी व्हायला वेळ लागत नाही. कोणताही प्रसंग उद्भवण्यापूर्वी आपण सावध राहिलो तर जीवन अधिक अर्थपूर्ण होईल. यासाठी विमा कवच महत्त्वाची भूमिका बजावते.
हेही नक्की वाचा >> जीवन विमा आणि त्याचे प्रकार
विमा कवच आणि गैरसमज
काही लोक त्यांचे उत्पन्न कमी असल्याचे सांगतात, तर काहींना विम्यामध्ये पैसे गुंतवणे म्हणजे वायफळ पैसे घालवणे असे वाटत असते. काही लोक विमा योजने ला फसवी आणि वेळखाऊ प्रक्रिया असलेली योजना असे समजतात. अर्थात, हे सर्व आजूबाजूला घडत असलेल्या गैसमजुतीने घडत असते. मोटर वाहन कायद्यानुसार वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे पण हाच नियम आपण आपल्या कौटुंबिक किंवा सामाजिक जीवनाला लावताना दिसत नाही. तसे करणे धोक्याचे ठरू शकते. जोपर्यंत अडचण निर्माण होत नाही तोपर्यंत आपणाला त्याचे गांभीर्य समजत नाही.
एक उदाहरण पाहूया
सुदेश मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करत होता. गृह कर्ज काढले असल्यामुळे पगारातील उर्वरित रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवत होता. एके दिवशी अचानक त्याच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला व त्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे त्याला दवाखान्यात राहावे लागले. डॉक्टरांनी दोन महिन्याची बेड रेस्ट घ्यायला सांगितली. त्याचा परिणाम नोकरीवर झाला. गृह कर्जाचे हफ्ते थांबले. बचत केलेली सर्व रक्कम दवाखाना व इतर खर्चासाठी त्याने पणाला लावली. आर्थिक चणचण भासू लागली. यामधून त्याने एक धडा घेतला की संकटसमयी विमा कवच उपयोगी पडते. त्याने सर्वप्रथम स्वतःसाठी आरोग्य विमा काढला. त्यानंतर वार्षिक उत्पन्नाच्या 15-20 पट जीवन विमा काढला. अशाप्रकारे त्याने विमा कवच काढून स्वतःला संरक्षित केले.
तुम्हाला माहीत आहे का?
1818 मध्ये ओरियंट लाइफ इन्शुरेंस कंपनीतर्फे भारतात कलकत्ता येथे पहिल्यांदा विमा व्यवसायाला सुरुवात झाली. विम्याला सुरक्षित आर्थिक कवच समजले जाते. सुरक्षकवचाबरोबर 80 C अंतर्गत जीवन विम्यासाठी तर आरोग्य विम्यासाठी 80 D अंतर्गत कर सवलत मिळते. |
वरील उदाहरण बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की त्याने आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. हीच गोष्ट त्याने सुरवातीला किंवा नोकरी लागल्यानंतर केली असती तर वेळ आणि पैशाची चांगली बचत झाली असती, ज्याचा उपयोग त्याला इतर आर्थिक गरजा भागविण्यासाठी करता आला असता. मोठमोठे उद्योगपती त्यांच्या उद्योगाचा विमा काढतात. फॅक्टरी किंवा औद्योगिक प्रकल्पामध्ये काही अनुचित किंवा इतर अपघात घडल्यास विमा कवच उपयोगी पडते. अचानक आरोग्य समस्या उद्भवल्यास आरोग्य विमा उपयोगी पडतो. आपल्यावरती आपले कुटुंब अवलंबून असल्यास जीवन विमा कवच आपली काळजी घेतो. आपल्या अचानक जाण्याने आर्थिक नियोजन ढासळू नये किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तीला त्याचा सामना करावा लागू नये म्हणून जीवन विमा महत्वाची भूमिका बजावतो. याबरोबर इतरही भरपूर गोष्टी आहेत ज्या विमा कावचने सुरक्षित करता येतात. उदा. अपघाती विमा, प्रवासी विमा, संपत्ती विमा, वाहन विमा इत्यादी.
निष्कर्ष:
सर्वसामान्य लोकांनी उत्पन्न चालू झाल्यास लगेचच आरोग्य व जीवन विम्यास प्राधान्य दिले पाहिजे. छोटा असला तरी चालेल पण अडचणीच्या काळात तो मोठी भूमिका बजावतो हे विसरून चालणार नाही. फक्त कर बचत किंवा इतरत्र मिळणारी सूट या गोष्टी न पाहता तो किती अनमोल आहे आहे याचा अंदाज बांधणे गरजेचे आहे. वेळीच विम्याचे गांभीर्य लक्षात आले तर जीवनाचे आर्थिक व सामाजिक नियोजन योग्य पद्धतीने पार पाडता येईल यात शंका नाही