कर्ज वेळेत फेडायचे आहे? या सोप्या पद्धती वापरून कर्जाचा भार हलका करा.

महत्वपूर्ण माहिती- कर्ज वेळेत कसे फेडायचे? त्यावरील उपाय योजना, उदाहरण इत्यादी.

कर्जाचा भार हलका करण्यासाठी कर्ज वेळेत फेडणे गरजेचे आहे. कर्जाचे ओझे वाहत असताना किंवा नसतानासुद्धा आर्थिक चणचण कधीही भासू शकते. काहींसाठी ती व्यवसायिक स्वरूपात, काहींसाठी आरोग्याशी संबंधित खर्चाच्या स्वरूपात, तर काहींसाठी चुकीच्या नियोजनामुळे ती भासू शकते. त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

तुमच्या कर्जांचा व्यवस्थित अभ्यास करा

यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. उदा. तुमची एकूण किती कर्जे आहेत? त्यापैकी जास्त थकबाकी असलेली किती कर्जे आहेत? हफ्ता चुकलेली किती कर्जे आहेत? त्या कर्जांचे व्यवस्थित हफ्ते जातात का? जात नसतील तर ती कर्जे एनपीए म्हणजेच वेळेत भरली नाहीत म्हणून बँकेने अनुत्पादित वर्गात टाकली आहेत का? याची चौकशी तुम्ही बँकेत केली आहे का? तुम्हाला कर्जाच्या व्याजदर संबंधित सर्व माहिती आहे का? त्याची गणना कशी होते याची कल्पना आहे का?

वरील बहुतांश प्रश्नांची उत्तरे ‘माहीत नाही’ अशी असतील तर तुम्हाला वेळीच सावध होणे गरजेचे आहे. तुम्ही काढलेल्या कर्जाचा बारीक अभ्यास करा. त्याचे सर्व तपशील कर्ज घेतलेल्या बँकेकडून किंवा संस्थेकडून मागवून घ्या. आतापर्यंत भरलेले हफ्ते आणि इथून पुढच्या हफ्त्याचे नियोजन कसे करायचे याविषयी काही अडचण असल्यास बँक व्यवस्थापकाशी चर्चा करा.

मासिक उत्पन्न आणि व्यवस्थापन

मासिक उत्पन्न किती आहे आणि तुम्ही कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करता याचा आढावा घ्या. उदा तुम्ही इंधन, घर देखभाल खर्च, किराणा माल या यावरती किती खर्च होतोय याची एक यादी तयार करा. प्रत्येक महिन्याला सरासरी तेवढाच खर्च होतोय का ते पाहा. कमी जास्त होत असेल तर त्याची कारणे शोधून तातडीने उपाय करा. अनावश्यक खर्च टाळा. अनावश्यक गुंतवणूक टाळा. इथे अनावश्यक गुंतवणूक म्हणजे अनेकांना शेअर मार्केटसारख्या ठिकाणी अभ्यास न करता ट्रेडिंग करायची सवय असते. अशी सवय धोकादायक तर असतेच पण स्वतःचे आर्थिक गणित बिघडवणारी असते. त्यामुळे हा पर्याय चांगल्या पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. कर्जाचा भार असताना अश्या प्रकारच्या शॉर्ट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणे आणखी कर्जाला आमंत्रण देवू शकते. महिन्याला जेवढे उत्पन्न येते त्यातील योग्य वाटा बचत आणि कर्जाच्या हप्त्यासाठी राखून ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे महिन्याला येणाऱ्या उत्पन्नाचे व्यवस्थापन ज्याला जमते त्याला आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत नाही. अगदी वीस हजार उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींचे नियोजन एक लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगले आणि नियोजनबध्द असू शकते.

सर्वाधिक थकबाकी असलेल्या कर्जाला लक्ष्य करा

हा सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित होणारा विषय आहे. अनेकजण जास्त थकबाकी असलेल्या कर्जाला परतफेडीसाठी प्राधान्य देत नाहीत. असे न करता जास्त थकबाकी म्हणजे जास्त भार या तत्वाप्रमाणे सर्वात जास्त थकबाकी असलेले कर्ज प्रथम फेडा. त्याच्या हफ्त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. वेळ आणि उत्पन्न याचा ताळमेळ उत्तम बसत असेल तर कर्जावरील व्याजावर लक्ष्य ठेवा. चक्रीवाढ व्याजाने जास्त फटका बसत असेल तर मुद्दल कमी करण्यासाठी टप्प्या- टप्प्याने कर्जाची परफेड करत चला. मुद्दल कमी झाल्यावर आपोआपच व्याजाची रक्कम आवाक्यात येईल. याचा दुसरा फायदा म्हणजे, पुढील आर्थिक निर्णय घेताना मानसिक ताण येणार नाही.

कर्ज आणि Systematic Investment Plan

समजा तुमच्या कर्जाचा कालावधी जास्त आहे. उदा दहा वर्षांहून अधिक आहे. प्रत्येक वेळेस कर्ज काढताना इतका कालावधी कर्ज फेडण्यासाठी घेत असाल तर त्यामध्ये काही वेगळे पर्याय तपासून पाहता येतील. उदा छोटीसी गुंतवणूक. कर्जाचा हप्ता जितका जातोय त्याच्या दहा टक्के रक्कम Systematic Investment Plan अर्थात SIP करून कर्जाच्या भाराला अंतिम टप्प्यामध्ये मात करू शकता. यासाठी एक उदाहरण पाहूया.

सुरेशने गृहकर्ज काढल्यानंतर महिन्याला वीस हजार हफ्ता कर्जफेडीसाठी त्याच्या खात्यातून वजा होतोय. कर्ज फेडीचा कालावधी वीस वर्षे आहे. याचाच अर्थ पुढील वीस वर्षे सुरेश महिन्याला 20000 रुपये हफ्ता कर्जाला नियमितपणे देणार आहे. या हप्त्यामध्ये त्याने दहा टक्के रक्कम हप्ताच जातोय असे समजून बाजूला काढली तर त्याचे 2000 अतिरिक्त वाढतील. आता, त्याच 2000 रुपयाची गुंतवणूक एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात वीस वर्षासाठी गुंतवली तर महिना 20000 हप्त्याने फेडलेले कर्ज व 2000 महिना गुंतवलेल्या रकमेचा परतावा याचा सुंदर ताळमेळ बसेल व आपले नेमके पैसे किती गेले याचा आर्थिक फायदा समजण्यास मदत होईल. कर्जाचा हप्ता 9% व्याजदराने असल्यास व म्युच्युअल फंडाचा परतावा सरासरी 12% मिळाल्यास आर्थिक फायदा चांगला होऊन कर्ज स्वरूपात फेडलेली रक्कम काहीच वाटणार नाही.

तुम्हाला माहीत आहे का?

Loan repayment किंवा कर्जाची परतफेड करत असताना बऱ्याचजणांना कर्जावर असलेल्या व्याजदारची किंवा त्याच्या पद्धतीची नेमकी माहिती नसते. अश्यामुळे अनेकजण कर्जावर असलेल्या सवलतीला किंवा चांगल्या व्याजदराला मुकतात ज्याचा परिणाम आर्थिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरतो. भारतातील 50% लोकांना तर त्यांच्या कर्जाची परतफेड योग्य होत असेल तर सीबील स्कोअर सुधारतो हेही माहीत नाही

आपत्कालीन निधी तयार करा

जास्त कर्जाचा भार असण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे आपत्कालीन निधी नसणे होय. समजा तुमचा व्यवसाय किंवा नोकरी संकटात सापडली तर पुढील 6 ते 8 महिने घरातील खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे थोडीशी रक्कम असणे गरजेचे आहे. यालाच आपण आपत्कालीन निधी किंवा emergency fund म्हणतो. असे पैसे किंवा निधी उपलब्ध नसल्यास बाजारातील चढ्या व्याजदराने आपल्याला आणखी कर्ज घ्यावे लागु शकते ज्याचा अंतिम भार तुमच्या खिशाला परवडणारा नाही. आपले उत्पन्न महिना 50000 असेल तर किमान 2-3 लाख रुपये आपत्कालीन निधी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. याचा फायदा असा होईल की जेंव्हा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल त्यावेळेस चढ्या व्याजदराने वैयक्तिक कर्ज घ्यायची गरज नाही. आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल. तसेच अगोदर फेडत असलेल्या कर्जाच्या हफ्त्यात खंड पडणार नाही.

निष्कर्ष

वरती उल्लेख केलेले उपाय बारकाईने समजून घेऊन अमलात आणल्यास कर्जाचा अतिरिक्त भार कमी करणे सोपे जाईल. मोठ्या कालावधीची कर्जे आणि त्याचे हफ्ते जास्त दिसत असले तरी छोटी कर्जेसुद्धा ज्यादा व्याजदाराने मोठा भुर्दंड तयार करत असतात. याला योग्य आर्थिक नियोजणानेच चांगल्या प्रकारे हाताळता येईल.

हेही नक्की वाचा >>घर खरेदीचे नियोजन: बँकेची व कर्जाची निवड कशी कराल? होम लोन कागदपत्रे, पात्रता आणि इतर महत्वपूर्ण गोष्टी..!

Leave a Comment