रुपया आणि डॉलर यांचे भाव कसे ठरतात?

महत्वपूर्ण माहिती– रुपया आणि डॉलर यांचे संबंध, भारतीय आणि परकीय चलनाचा संबंध, चलन कसे काम करते?, रुपया आणि डॉलर यांचे भाव कसे ठरतात? इत्यादी प्रश्नांची सविस्तर उत्तरे या लेखात वाचायला मिळतील.

अनेकदा आपण रुपयाचा भाव वधारला, डॉलर महागले, रुपयाची पडझड सुरूच.. अशा अनेक बातम्या वाचत असतो किंवा टीव्हीवर बघत असतो. भारताचे चलन नेहमी सशक्त राहावे म्हणून अनेक सरकारी व वैधानिक संस्था काम करत असल्या तरी रुपया आणि डॉलर यांचे भाव कसे ठरतात याची सामान्य लोकांना सहसा माहिती नसते. हे आपल्यासाठी नाहीच किंवा या काहीतरी तांत्रिक गोष्टी आहेत असे समजून अनेकजण त्या जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. अर्थव्यवस्थेमध्ये आढळणारी कोणतीही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेतल्याखेरीज आपणाला त्याची गोडी निर्माण होत नाही हेही तितकेच खरे. म्हणूनच रुपया आणि डॉलर याचे भाव कसे ठरतात याची इत्यंभूत आणि सोप्या भाषेत माहिती घेवूयात.

चलन कसे काम करते?

एखाद्या व्यक्तीकडे एक वस्तू असल्यास तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीकडे असेल असे नाही. याचाच अर्थ, समजा पहिल्या व्यक्तीकडे अशा अनेक वस्तू असतील व तो विक्रेता असेल तर दुसरा व्यक्ती त्या वस्तूची उपयुक्तता लक्षात घेऊन विकत घेईल. या विकत घेण्याच्या देवाणघेवानीच्या माध्यमाला आपण चलन म्हणू शकतो. उदा. पूर्वी गावोगावी धान्याच्या बदल्यात कोणत्यातरी सेवा पुरविल्या जायच्या. म्हणजेच धान्य देवून लोक सेवांचा लाभ घेत असत. जसे की शेतात काम केल्यास त्या मजुराला धान्य दिले जायचे. इथे, धान्य चलन समजले जायचे. काळ गेला. आधुनिक काळात चलनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले तरी शेवटी एका सक्षम चलनासाठी अर्थव्यवस्थेने स्वतःहून रुपयाच्या स्वरूपात पर्याय उभा केला आणि भारताचे सुलभ व्यवहारिक चलन ” रुपया “ झाले. आज कोणतीही वस्तू घ्यायला गेल्यास मूलभूत व्यवहाराची परिभाषा रुपयाभोवतीच फिरते हे विसरून चालणार नाही. प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन आहे. उदा. अमेरिकेचे चलन डॉलर आहे, तर चीनचे चायनीज युवान आहे.

भारतीय आणि परकीय चलनाचा संबंध

वरती उल्लेख केल्याप्रमाणे देशांतर्गत बाजारपेठेत व्यवहार करण्यासाठी आपण स्वकीय चलनाचा म्हणजेच भारतीय रुपयाचा वापर करतो. पण समजा, बाहेरील देशाशी व्यवहार करायचे असल्यास काय होईल? बाहेरील देश आपले चलन स्वीकारतील का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. त्यांच्या देशात जे चलन आहे तेच ते स्वीकारतील अन्यथा परकीय चलनाला रूपांतरित करून घ्यावे लागेल. पण रूपांतरित करून घेण्यासाठी एक प्रमाण ठरवावे लागेल जेणेकरून आपणाला त्या चलनाने सहज व्यवहार करता येईल. पण इथे एक अडचण आहे. दर ठरवताना सगळ्यांचे चलन सारखेच असेल असे नाही. आपण जो व्यवहार चीनशी करतो तोच व्यवहार अमेरिकेसाठी लागू होईल असे नाही. कारण दोन्ही देशांची चलने वेगवेगळी आहेत. अर्थव्यवस्था वेगळी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्याची पद्धत वेगळी आहे. ज्याची अर्थव्यवस्था सक्षम आहे, त्याला दुसऱ्या देशाचे चलन घेण्याची गरज भासणार नाही. कारण सर्वच बाबतीत तो देश स्वयंपूर्ण असेल. अर्थात, हे ठरवण्याचे मापक त्या देशातील आयात निर्यातीच्या व्यवहारावर अवलंबून असेल. जो देश परकीय आयातीवर जास्त अवलंबून असेल त्याला त्या परकीय चलनाची जास्त गरज भासेल. इथेच ‘ विनिमय दर’ आणि ‘चलनाचे मूल्य’ या महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील. त्यालाच अनुसरून आपण रुपया आणि डॉलर यांचे भाव कसे ठरतात याची माहिती समजून घेतोय.

रुपया आणि डॉलर यांचे भाव कसे ठरतात?

डॉलर चलन असलेल्या देशाकडून तुम्ही ज्या ज्या वस्तू आयातीच्या स्वरूपात खरेदी करता त्यासाठी आपणाला डॉलर खर्च करावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर हे चलन सर्वाधिक सक्षम असल्यामुळे त्याला नेहमी मागणी असते. बाजारात डॉलर चलन असलेल्या वस्तूंची मागणी जास्त झाल्यावर डॉलरचा भाव वाढतो आणि आपले चलन जास्त खर्ची करावे लागते. आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत याच प्रक्रियेला ‘ विनिमय दर ‘ म्हणतात. डॉलर घेण्यासाठी आपला किती रुपया खर्ची होतोय हेच हा विनिमय दर ठरवत असतो. रुपया जास्त खर्च होत असेल तर डॉलर महागला असे आपण म्हणतो, तर रुपया कमी खर्च होत असेल तर डॉलर स्वस्त आहे असे आपण म्हणत असतो. बाजारातील मागणी आणि पुरवठा कसा आहे यानुसार दररोज विनिमय दर बदलत असतो. याच बाजारातील परिस्थितीवर आपोआप बदलणाऱ्या दरास ‘Rupee appreciation’ किंवा त्याउलट ‘Rupee depreciation’ असे म्हंटले जाते. जास्त टेक्निकल मुद्द्यात न पडता आपण एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो की, आपल्या खिशातील किती रुपये परकीय वस्तू घेण्यासाठी खर्च होत आहेत. जेवढे जास्त तेवढे परकीय चलन महाग आणि जेवढे कमी तेवढे परकीय चलन स्वस्त.

तुम्हाला माहीत आहे का ?

भारताकडे परकीय चलनाचा नियमित साठा असणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी आणि अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी परकीय चलन महत्वाची भूमिका बजावते. जुलै 2023 नुसार भारताकडे एकूण 600 बिलियन डॉलरहून अधिक परकीय चलन साठा आहे. जो भारतीय अर्थव्यवस्थेची पत दर्शवतो.

1993 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक विनिमय दरावरती नियंत्रण ठेवत असे. पण त्यानंतर विनिमय दर आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. आयात निर्यात, जागतिक अर्थव्यवस्था आणि त्यामधील घडामोडी, परकीय चलन साठा इत्यादी अनेक घटक विनिमय दर वाढीस वा कमी होण्यास कारणीभूत ठरत असतात. आपल्या चलनाची बाजारातील पत कशी आहे याच्यावरती अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक इत्यादी यंत्रणा लक्ष ठेवून असतात. डॉलर स्वस्त झाल्यास भारताला फायदा होतो. पण आपली अर्थव्यवस्था फार काळ आयातीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी रुपया सक्षम होणे गरजेचे आहे.

हेही नक्की वाचा >> कर्ज वेळेत फेडायचे आहे? या सोप्या पद्धती वापरून कर्जाचा भार हलका करा.

Leave a Comment