कर्ज हस्तांतर किंवा ट्रान्स्फर करताना…!

आजकाल कर्ज घेणे सोपे झाले असले तरी फेडताना असंख्य गोष्टींची कसरत होते. उत्पन्न व बचत यांचा ताळमेळ घालताना बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागते. व्याजदर कितीही चढे झाले किंवा कमी झाले तरी कर्ज घेणाऱ्यांची संख्या बदलत नाही कारण लोकांच्या गरजाही त्या प्रमाणात वाढललेल्या दिसून येत आहेत. कर्ज घेतले असल्यास पहिला अनुत्तरित प्रश्न असतो तो म्हणजे व्याजदरात झालेला बदल. आत्ताच मी कर्ज घेतले आणि असे अचानक व्याजदर कसे कमी झाले हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. याचाच अर्थ कर्जावर कमी झालेले व्याजदर सर्वांनाच आवडत असतात. याच घाईगडबडीत घेतला जाणारा मोठा निर्णय म्हणजे ‘कर्जाचे हस्तांतर ‘ होय. दुसऱ्या बँकेचे कर्ज स्वस्त आहे व व्याजदरही कमी आहे हे एकमेव कारण पुढे करून मोठे निर्णय घेतले जातात व कर्ज हस्तांतरित किंवा ट्रान्स्फर केले जाते.

ग्राहकाच्या दृष्टीने कितपत महत्वाचे?

2016 पासून सर्व कर्जे एम सी एल आर दराशी सलग्नित केली गेलेली आहेत ज्याचा थेट संबंध कर्जाच्या व्याजदराशी जोडलेला आहे. यात आणखी सुधारणा करत गृह कर्जासारखे  व्याजदर 2019 पासून रेपो दरांशी जोडले गेले आहेत. याचा फायदा ग्राहकाला होत असल्यामुळे नुकतेच कर्ज घेतलेल्या ग्राहकांची द्विदा मनस्थिती कर्ज प्रक्रियेवर प्रभाव टाकणारी असू शकते. यातून आपण काय शिकले पाहिजे किंवा कर्ज हस्तांतर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहूया.

 

  1. कर्जाची रक्कम किती आहे ते पाहा. जास्त कर्ज घेतले असल्यास फेडण्याची क्षमता त्या पटीत ग्राह्य धरली जाते व तितकाच जास्त मासिक हफ्ता असतो. कालावधी जास्त असला तर हफ्ता कमी बसु शकतो पण व्याज जास्त भरावे लागते ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
  2. नुकतेच कर्ज घेतले असेल व दुसऱ्या बँकेचे व्याजदर कमी दिसत असतील तर कर्ज हस्तांतर किंवा ट्रान्स्फर करायला हरकत नाही. एकूण विचार केल्यास कर्ज फेडीची मुदत संपेपर्यंत मिळणारा लाभ किंवा व्याजदरात मिळत असलेली सूट आपले पैसे वाचवू शकते, यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही. वेळीच योग्य निर्णय घेतल्यास हे साध्य करणे शक्य आहे.
  3. काही बँका कर्ज हस्तांतर किंवा ट्रान्स्फर करताना प्रक्रिया शुल्क लावू शकतात. त्याची योग्य ती खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. आणखी छुपे किंवा इतर शुल्क लागू आहेत का त्याची चौकशी करा. ते शुल्क हस्तांतर शुल्क आहे की फोरक्लोजर शुल्क आहे हे तपासून घ्या.
  4. सध्याच्या कर्ज देणाऱ्या बँकेने कोणत्या प्रकारचा विमा काढला आहे त्याची माहिती करून घ्या. जीवन विमा असेल तर तो तसाच राहील पण बँकेच्या विविध योजनेवर तो विमा अवलंबून असेल तर मात्र तो पोर्टेबल होतो का त्याची खात्री करून घ्या. उदाहरण द्यायचे झाल्यास वाहन कर्ज घेतले असल्यास वाहनावरील विमा तसाच राहील, पण सुरक्षित गहाण ठेवलेल्या वस्तूंच्या विम्याचे भवितव्य काय असेल हे कर्ज देणाऱ्या बँकेकडून माहिती करून घ्यावे लागेल.
  5. नॉन बँकिंग वित्तीय संस्था कर्ज हस्तांतराला किती प्रतिसाद देतात त्याची माहिती घ्या. ते कर्ज बँकेमध्ये ट्रान्स्फर करणे सोपे काम नाही. सध्यातरी अशा प्रकारच्या हस्तांतराला बऱ्याच नॉन बँकिंग वित्तीय संस्था दाद देत नाहीत किंवा भरमसाठ शुल्काचा वर्षाव करताना दिसून येतात. अशा वेळेस सर्व गोष्टींची माहिती अद्यावत ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना प्रश्न विचारता येतील.

निष्कर्ष 

कर्ज हस्तांतरणाचा किंवा ट्रान्स्फर करण्याचा निर्णय एकदाच घ्यायचा आहे. आणखी कुठेतरी व्याजदर कपात दिसते किंवा तुलनेने कमी व्याजदर दिसतो म्हणून कर्ज प्रक्रियेशी छेडछाड करणे योग्य नाही किंवा ते आर्थिक शिस्तीचे लक्षण नाही. थोडासा फरक असेल तर कर्ज फेडीची प्रक्रिया सुरळीत ठेवणेच योग्य राहील. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कर्ज ट्रान्स्फर करताना आपण जिथे कर्ज ट्रान्स्फर करणार आहोत त्या बँकेच्या नियमाची किंवा करारपत्र तपशिलाची योग्य माहिती घेतली आहे याची खात्री करणे सोयीस्कर ठरते. काही दिवसानंतर अगोदरचा कर्जदार बरा होता आपण चुकीचा निर्णय घेतला असा पश्चाताप करण्यात अर्थ नाही. या गोष्टी जाणीवपूर्वक विचार करून अंमलात आणल्यास  भविष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील व आपल्या इतर आर्थिक नियोजनावर आपले लक्ष लागेल यात शंका नाही.

Leave a Comment