SIP ला गुंतवणूकीचे सर्वोत्कृष्ट साधन का म्हंटले जाते ?

SIP किंवा Systematic Investment Plan ही अलीकडे प्रचलित असलेली सर्वात चांगली गुंतवणूक पद्धत आहे असे सर्वजण म्हणतात. पण त्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत की फक्त गुंतवणुकीचा उत्तम परतावा म्हणून याविषयी समज गैरसमज आहेत हे आपल्याला पाहावे लागेल. गुंतवणूक करण्यासाठी अनेकजण बाजारातील असंख्य प्रकार पडताळून बघतात. बँकेमध्ये ठेव ठेवणारा वर्ग मोठा आहे. तर त्यापलीकडे प्रत्यक्ष शेअर किंवा कमोडिटी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी युवा वर्ग प्रसिद्ध आहे. SIP या सर्वच गुंतवणूक पद्धतींना मात करण्यासाठी आहे का..? की फक्त SIP त्याच्या प्रसिद्धीमुळे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अपिहार्य पर्याय बनला आहे. हजारो कोटींच्या उलाढाली करणारे फंड हाऊसेस आपल्याला कोणत्या परताव्याची हमी देतात? जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे मार्केट रिस्क किंवा बाजार जोखीम घेणारा वर्ग इतक्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची काय कारणे असावीत? SIP ला गुंतवणुकीचे सर्वोत्कृष्ट साधन खरंच म्हणायला हवे का? म्युच्युअल फंडाच्या दृष्टीने या सर्वांची कारणीमिमांसा आपल्याला करावी लागेल.

1. कमीत कमी गुंतवणुकीचा पर्याय

SIP ही अगदी 100 रुपयांपासून चालू करता येते. हीच सर्वात जमेची बाजू म्हणता येईल. बँकांमधील किंवा इतर गुंतवणुकीची माध्यमे सहसा असा पर्याय उपलब्ध करून देत नाहीत, किंवा दिला तरी त्यामध्ये मुदतीचे बंधन असतेच. एखाद्याचे उत्पन्न काही हजारामध्ये असले तरी त्यासाठी SIP पर्याय वरदानच आहे.

2. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध

SIP चे सर्वात चांगले वैशिष्ठ्य म्हणजे त्यामध्ये असलेले अनेक पर्याय होय. जोखीम क्षमता कशी आहे त्याप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदा ज्याची गुंतवणूक करण्याची क्षमता जास्त कालावधीसाठी आहे त्यासाठी निव्वळ इक्विटी सारखे अनेक पर्याय आणि योजना उपलब्ध आहेत. तर छोट्या कालावधीसाठी डेट फंड उपलब्ध आहेत.

3. ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमे

SIP मध्ये मोबाईल किंवा डिजिटल एप्लिकेशन्स वापरून सहज गुंतवणूक करता येते. ऑनलाईन केवायसी करून काही मिनिटांच्या अंतराने SIP गुंतवणूक सुरू करता येवू शकते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाते म्हणून यामध्ये सहजता आणि सुलभता अधिक दिसून येते.

4. मार्केट किंवा बाजारातील चढ उतारावर लक्ष्य ठेवण्याची गरज नाही.

SIP मध्ये केली जाणारी गुंतवणूक टप्प्या टप्प्याने विशेषतः महिन्याने केली जात असल्यामुळे दररोज उठून बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची गरज नाही. SIP स्वरूपात केलेली गुंतवणूक फंड हाऊसकडे जाते आणि तिथून गुंतवणूक केल्या गेलेल्या दिवशीचे मूल्य NAV किंवा नेट असेट व्हॅल्यूच्या स्वरूपात मोजले जाते. इथे स्वतःहून वेगळे काही करण्याची गरज नाही. SIP त्या त्या दिवशी गुंतवणूक करत राहील.

5. SIP गुंतवणूक थोड्या कालावधीसाठी थांबवता येते.

SIP गुंतवणूक करताना अनेक नावीन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आल्या आहेत. पूर्वी गुंतवणूक करताना पैशाची टंचाई किंवा अडचण निर्माण झाल्यास SIP गुंतवणूक पूर्णपणे थांबवावी लागत असे. आता तसे नाही. SIP गुंतवणूक केल्यानंतर काही महिन्यासाठी, सहा महिन्यांसाठी वगैरे विश्रांती घ्यायची असल्यास SIP Pause करता येते. नंतर पुन्हा आहे तशीच चालू योजनेतील SIP चालू करता येते.

6. चक्रवाढ व्याजाचा फायदा.

SIP गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. त्यामधील सर्वात मोठा आणि गुंतवणुकीचे रुपडे पालटणारा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज होय. प्रत्येक महिन्याला SIP स्वरूपात गुंतवली जाणारी रक्कम पुन्हा नफ्यासह गुंतवली जाते ज्याच्या उपयोग चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळवण्यासाठी होतो. जितका चक्रवाढपद्धतीने गुंतवणुकीचा कालावधी जास्त तितका फायदा अधिक. त्यामुळे काही वेळेस सुरुवातीला कमी वाटणारा परतावा चक्रवाढ पद्धतीने वाढू लागतो. हे SIP च्या गुंतवणुकीचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य आहे.

7. SIP Step up करा किंवा नवीन गुंतवणूक करा.

SIP Step up हा आणखी एक चांगला आणि सक्षम पर्याय फंड हाऊसेस देत आहेत. अगदी सुरुवातीस किंवा SIP चालू झाल्यानंतर वर्षाकाठी 10% किंवा 20% किंवा काही रकमेच्या स्वरूपात दरवर्षी SIP गुंतवणूक वाढवू शकता. उदा एखाद्याची महिन्याला SIP स्वरूपात होणारी गुंतवणूक 10000 असेल आणि त्याला वाटत असेल की भविष्यात त्याचे उत्पन्न वाढणार आहे अशावेळेस तो पुढील वर्षीपासून प्रत्येक वर्षी 10% वगैरे SIP आहे त्या योजनेमध्ये स्टेप अप च्या सहाय्याने वाढवू शकतो. त्यासाठी वेगळी SIP सुरू करण्याची गरज नाही.

8. गुंतवणुकीचा तपशील

आपण SIP च्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीचा तपशील अगदी सहज पाहू शकतो. ग्राफ, चार्ट किंवा तुलनात्मक गुंतवणुकीचे स्वरूप आपणाला पाहता येते. इतकेच काय फंड हाऊसेस महिन्याच्या महिन्याला त्याचे स्टेटमेंट डिटेल्स पाठवतात. फंड हाऊसेसची स्वतंत्र ॲप्लिकेशन आहेत ज्यामध्ये NAV किंवा फंडच्या योजनेची कामगिरी पाहता येते. त्यामधील नावीन्यपूर्ण बदल, सूचना, इशारे इत्यादी माहितीचा तपशील आपल्याला लगेच मिळून जातो. गुंतवणुकीबाबत काही शंका असल्यास एकाच ठिकाणी माहिती मिळत असल्यामुळे गोंधळ निर्माण होण्याचे काही कारण नाही.

सारांश

वरील माहितीचा बारकाईने अभ्यास केल्यास SIP द्वारे होणारी गुंतवणूक एक चांगला पर्याय ठरू शकतो का याचे उत्तर मिळते. गुंतवणुकीची शिस्त, योग्य SIP गुंतवणूक योजनेची निवड, जोखीम क्षमतेची जाणीव असे अनेक घटक SIP गुंतवणुकीला कारणीभूत आहेत. याचा योग्य ताळमेळ घातल्यास आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट ध्येयाशी निगडित ठेवल्यास SIP हे गुंतवणुकीचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणायला हरकत नाही.

Leave a Comment