सर्वांनी वाचावीत अशी आर्थिक जागरूकता वाढवणारी पुस्तके..
मराठीमध्ये अर्थ साक्षरतेची म्हणावी तितकी पुस्तके उपलब्ध नसली तरी काही उत्कृष्ट पुस्तके मराठीमध्ये अनेक तज्ञ लोकांनी लिहिली आहेत. वित्त व्यवस्थापन कसे असावे इथेपासून जागतिक अर्थव्यवस्था कशी चालते त्यातील संकल्पना इत्यादी अनेक किचकट आणि अवघड संकल्पनांचा उलगडा पुस्तकामध्ये केलेला दिसून येतो. सामान्य लोकांना समजतील अशा सोप्या भाषेत लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. व्यवसाय करणाऱ्यांपैकी अनेक जणांना प्रत्यक्ष त्यातील क्लिष्ट गोष्टी समजत नाहीत, तर अनेकांना आर्थिक नियोजन कसे करायचे याचेसुद्धा भान नसते. पैश्याचा ओघ येऊन चालत नाही तर उत्पन्न मिळालेल्या पैशातून त्याचे नियोजन कसे करायचे यावरही अनेकांनी प्रकाश टाकला आहे. काही मोजक्या पण सर्वांनी वाचावीत अशा मार्गदर्शक पुस्तकाची माहिती आपण पाहूया.
1. अर्थात – अच्युत गोडबोले
अच्युत गोडबोले यांच्या लिखाणाची शैली इतकी जबरदस्त आहे की एकदा वाचायला घेतलेले ‘ अर्थात ‘ पुस्तक शेवटपर्यंत मंत्रमुग्ध होवून वाचावे लागते. जागतिक अर्थ विषयांशी संबंधित, अर्थव्यवस्था कशी काम करते या माहितीवर हे पुस्तक प्रकाश टाकते. ऍडम स्मिथ, आल्फ्रेड मार्शल, जॉन मेनार्ड केन्स इत्यादी लोकांच्या संशोधन प्रबंधन आणि संकल्पनांवर आधारित थेरीस् अगदी सोप्या भाषेत उलगडा करण्यामध्ये ‘ अर्थात ‘ हे पुस्तक यशस्वी झाले आहे. अर्थशास्त्राचा अभ्यासक किंवा विद्यार्थी या नात्याने हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवे.
2. बॅलन्सशीट व फायनान्स समजून घेताना – अनिल लांबा
व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अनिल लांबा सरांचे “बॅलन्सशीट व फायनान्स समजून घेताना” हे पुस्तक जरूर वाचावे. बॅलन्सशीट मधील ताळेबंद म्हणजे काय..फंड फ्लो परीक्षण, फिनान्सियल स्टेटमेंटस्, आर्थिक व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची, त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या इत्यादी गोष्टी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. पुस्तकाचा सार व्यवसायिक आणि आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे याविषयी असल्यामुळे काही नावीन्यपूर्ण माहितीचा खजिना वाचावयास मिळतो.
3. अर्थसाक्षरतेच्या दिशेने – उदय पिंगळे
सामान्य लोकांना अनेक विषयांची कुतूहलता असते. त्यामध्ये शेअर मार्केट, गुंतवणूक, सरकारी योजना, पैशाचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. उदय पिंगळे सरांच्या “अर्थसाक्षरतेच्या दिशेने” पुस्तकात या सर्व संकल्पनांचा उलगडा करण्यात आला आहे. गुंतवणुकीचे पर्याय अमर्यादित असल्यामुळे आजूबाजूच्या अनेक फसव्या योजना आणि आपल्यासाठी योग्य योजना कोणत्या अशा मूलभूत साच्यावर हे पुस्तक आधारित आहे.
4. गोष्ट पैशापाण्याची – प्रफुल्ल वानखेडे
अर्थ जागृती निर्माण करणारे प्रफुल्ल वानखेडे यांचे ” गोष्ट पैशापाण्याची” हे पुस्तक व्यवहारकुशलता, स्मार्ट वर्क आणि आधुनिक गुंतवणुकीचे पर्याय याबद्दल अर्थ जागृती करताना दिसून येते. काही प्रोत्साहन देणाऱ्या प्रसंगाचे वर्णन लेखकाने या पुस्तकामध्ये केले आहे. एकूणच व्यवहारज्ञान आत्मसात करताना कसे जागरूक राहावे याबद्दल हे पुस्तक प्रकाश टाकते. सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे.