गिग अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

गिग अर्थव्यवस्था: Gig Economy information in Marathi, गिग अर्थव्यवस्थेचा इतिहास, गिग कर्मचारी, गिग अर्थव्यवस्थेचे महत्त्व, गिग अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, FAQs, इत्यादी माहिती.

सेवा देणाऱ्या आणि त्या सेवेची मागणी करणाऱ्या उपभोकत्या वर्गाला तात्पुरत्या किंवा गरजेनुसार व्यावहारिक पातळीवर एकत्र आणणाऱ्या व्यवस्थेला गिग अर्थव्यवस्था किंवा Gig Economy असे म्हंटले जाते. गिग (Gig) म्हणजेच जॉब किंवा एखादे काम. थोडक्यात उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या घरातील पंखा नादुरुस्त असेल तर एका विशिष्ट ऑनलाईन पद्धतीने किंवा ॲप्लिकेशनद्वारे दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीला आपण घरी येवून तो पंखा दुरुस्त करण्यास सांगतो. तसेच, अगदी काही तासासाठी त्या कामाचा त्याला मोबदला दिला जातो. इथे सेवा देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचे काम इतके वेगाने होते की स्वतःचे काम झाल्यावर उपभोक्ता वर्ग त्या व्यक्तीला दुसरे काम करण्याची मोकळीक देतो. अगदी तांत्रिक भाषेत त्याला ‘कॉल घेणे’ असे म्हंटले जाते.

गिग अर्थव्यवस्थेचा इतिहास काय सांगतो?

गिग ही व्यवस्था अलीकडे प्रचलित झाली असली तरी विसाव्या शतकाच्या प्रारंभीपासूनच त्याचे अस्तित्व होते. त्या काळी अमेरिकेत संगीतकारांना काही तासांसाठी मनोरंजन करण्यासाठी काम मिळत असे. त्यावेळेस ‘ गिग ‘ या शब्दाचा उदय झाला असल्याचे अनेक तज्ञ सांगतात. कमी अधिक प्रमाणात बरेचजण पार्ट टाईम काम करत असल्यामुळे सर्वांना आवश्यकतेनुसार गिग कर्मचारी उपलब्ध होवू लागले. पूर्वी वृत्तपत्रे आणि मासिकांच्या वितरणाचे प्रमाणे खूप जास्त होते. त्यामध्ये लिखाण करणाऱ्या लेखकांना किंवा त्याचा आशय लेखन करणाऱ्यांना पाश्चात्य देशांनी गिग व्यवस्थेचा भाग असल्याचे सांगितले. फ्रीलांसिंग करणारेसुद्धा त्याच यादीमध्ये येतात. विसाव्या शतकाच्या अखेरीस, म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय झाल्यानंतर गिग व्यवस्थेने एक मोठी भरारी घेतली. वेब आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक मोठ्या कंपन्यांनी यामध्ये उडी घेतली. काही स्टार्ट अप कंपन्या डिजिटल तंत्रज्ञानाचा अचूक आणि हुशारीने उपयोग करू लागल्या. लोकांची गरज त्यांनी ओळखली. 2008 च्या आर्थिक मंदीनंतर स्वावलंबी वर्गाचा मोठ्या प्रमाणात उदय झाला. भारतही त्याला अपवाद नव्हता. Ola, Uber, Olx, Zomato, Urban Company इत्यादी अनेक कंपन्या सहजता, सुलभता आणि उपलब्धता यावर काम करू लागल्या आणि लोकांनीही त्याला जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनवल्याचे दिसून येते.

गिग कर्मचारी कोण आहेत?

वरती उल्लेख केल्याप्रमाणे गिग म्हणजे काम होय. काम करणाऱ्या व्यक्तीला आपण कर्मचारी किंवा कामगार म्हणतो. आताच्या प्रचलित आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात Ola, Uber, Zomato, Urban Company, Go mechanic, फ्री लांसर्स, कंटेंट लिहिणारे इत्यादींना गिग कर्मचारी किंवा कामगार म्हणू शकतो. हे मागणी असेल तशी सेवा देण्यासाठी उपलब्ध असतात. गिग व्यवस्थेचे वैशिष्ट्यच ऑन डिमांड असे असल्यामुळे हा वर्ग असंघटित असला तरी  अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा प्रमुख घटक आहे.
Gig Economy in Marathi

गिग अर्थव्यवस्थेचे महत्त्व भारतामध्ये का वाढत आहे?

गिग अर्थव्यवस्था वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. उदारीकरणाच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेत सहजता आणि सुलभता आणण्यामध्ये ही व्यवस्था यशस्वी झाली आहे. जसे उत्पन्न वाढले तसे लोकांना ताबडतोब सेवा पुरवणाऱ्या घटकांची गरज भासू लागली. सेवेमध्ये पसंती करण्याचे पर्याय खुले झाले. ज्याला परवडेल, जसे परवडेल तशा पद्धतीने त्याची मागणी वाढली. याचा फायदा असा झाला की सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगली सेवा देण्याची स्पर्धा लागली. सध्या 1% हून अधिक GDP मध्ये गिग व्यवस्थेचा वाटा असून जवळपास 5 कोटींहून अधिक रोजगार निर्मिती करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावत आहे. सध्या एक कोटींहून अधिक गिग कामगार काम करत आहेत. कमी कौशल्य असणाऱ्यांची संख्या 20% च्या घरात आहे. तर जास्त आणि उच्च प्रतीचे कौशल्य असणाऱ्यांची संख्या 30% आहे. उरलेले जवळपास 50% गिग कामगार मध्यम दर्जाचे कौशल्य आत्मसात करतात. या सर्वांमध्ये रिटेल आणि सेल्स क्षेत्रातील गिग कामगारांची संख्या जास्त आहे. जागतिक कामगार संघटनेनुसार  2025 पर्यंत गिग अर्थव्यवस्था 23% हून अधिक वाढलेली असेल. तर गिग कामगारांचा आकडा 2029 पर्यंत दुप्पटीने वाढलेला असेल.

गिग अर्थव्यवस्थेसमोर कोणती आव्हाने आहेत?

गिग अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. अलीकडेच राजस्थान सरकारने गिग कामगारांना त्यांच्या हक्कासाठी कायदा तयार केला. आणि असा कायदा करणारे राजस्थान देशातील पहिले राज्य ठरले.

 

असंघटित वर्ग

गिग व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघटित वर्गातील समजले जात नाही. संघटित वर्गाची विशेष अशी रचना असते. ज्यामध्ये कामगार हक्काचे आणि जबाबदाऱ्यांचे संरक्षणात्मक कवच असते. गिग व्यवस्थेमधील कामगारांना मिळणारे फायदे तोटे, त्यांचे हक्क याविषयी आजही स्पष्टता नाही कारण तो असंघटित वर्गात गणला जातो.

मर्यादित संधी

अर्थव्यवस्थेमध्ये चांगला आणि मोलाचा भाग बनल्यानंतरही इथे मर्यादित संधी आहे असे अनेक गिग कर्मचाऱ्यांना वाटते. निश्चित हमी असलेले किंवा संघटीत क्षेत्रातील लोकांना असलेले फायदे इथे मिळत नाहीत. चांगले कौशल्य घ्या, बाजारामध्ये टिकून राहण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान शिका. आणि त्यानंतरही मागणी असेल तरच काम आणि दाम. असे एकंदरीत चित्र आहे. उदा. बाजारामध्ये पूर्वीचे Window AC दुरुस्त करणाऱ्यांची चलती होती. पण split आणि वायफाय, सेन्सर असलेल्या AC चे कौशल्य ज्याला अवगत आहे तोच इथे टिकणार. कारण ग्राहक वेगाने Upgrade होत असतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे.

विश्वासाहर्ता

“कामाबद्दल विश्वासार्हता” हे आणखी एक मोठे आव्हान आहे. ऑनलाईन रेटिंग बघून सेवेची मागणी करणारा जसा एक वर्ग आहे. तसाच त्या सेवेबद्दल विश्वासाहर्ता किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा देखील एक वर्ग आहे. अनेक वेळेस सेवेचे मूल्य प्रमाणापेक्षा अधिक असेल किंवा छुपा देखभाल खर्च वाढणार असेल तर लोक त्याला प्राधान्य देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

उत्पादन क्षमता

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक गिग कामगार पार्ट टाईम काम करताना दिसून येतात. कौशल्यावर आधारित अधिकचे ज्ञान घेण्यास यामध्ये मर्यादा आहेत असे अनेक गिग कामगार सांगतात. याचा थेट परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो. एखादी वस्तू अथवा ब्रँड इमेज चांगली असतानासुद्धा ती चांगल्या प्रकारे हाताळण्यास ही व्यवस्था कमी पडते.

तंत्रज्ञानाचा प्रभाव

गिग व्यवस्थेमध्ये हल्ली सर्वात कळीचा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव होय. AI व इतर वेब आधारित प्रणालींचा झालेला उदय कंटेंट राईटर किंवा फ्रीलान्सिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक वेगळे आव्हान देत आहे. फक्त बोलले तर किंवा एखादा साधा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे समोर येतात. अगदी स्पष्ट आणि व्याकरणीय दृष्ट्या बरोबर असलेला कंटेंट लेखकांचे महत्त्व कमी करताना दिसतोय. इतका हा प्रभाव वाढलेला दिसतोय.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न. Frequently Asked Questions (FAQs)

गिग कामगार कोण आहेत?

नेहमी मागणीनुसार काही कालावधीसाठी उपलब्ध सेवा पुरवणाऱ्या कामगारांना गिग कामगार म्हंटले जाते. उदा. फ्रिलांन्सर, मेकॅनिक, वस्तू दुरुस्त करणारे कारागीर इत्यादी.

गिग कामगारांना काय फायदे होतात?

गिग कामगारांना अनेक फायदे मिळतात. गरजेनुसार काम करण्याची सोय, सेवा आधारित भत्ते, काम करण्याचे स्वातंत्र्य इत्यादी.

गिग अर्थव्यवस्था म्हणजे काय?

सेवा घेणारा आणि ती सेवा प्रदान करणाऱ्या दोहोंना गरजेपुरते व्यवहारिक पातळीवर एकत्र आणणे म्हणजे गिग अर्थव्यवस्था होय. मागणीनुसार सेवा उपलब्ध करून देण्यात गिग अर्थव्यवस्था सध्या भारताच्या GDP मध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे.

हेही वाचा  >>  अर्थसंपदा ई दिवाळी अंक २०२३ (Arthasampada E Diwali Ank 2023)

Leave a Comment