Regular आणि Direct म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंडाची निवड करताना अनेकवेळा आपण Regular आणि Direct म्युच्युअल फंडाबद्दल ऐकत असतो. गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक जमलेल्या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी बांधील असतात. म्युच्युअल फंडात जमा होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा वापर त्या त्या गुंतवणुकीच्या जोखीम प्रकारानुसार केला जातो. काही म्युच्युअल फंड कंपन्या जास्त प्रमाणात होल्डींग ठेवतात तर काही कंपन्या मर्यादित गुंतवणुकीचे पर्याय खुले ठेवतात. पण, या सगळ्यामध्ये Regular व Direct गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध का असतो याची बऱ्याच जणांना माहिती नसते. हा पर्याय निवडताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. विशेषतः जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी या Regular आणि Direct म्युच्युअल फंडाची इत्यंभूत माहिती असणे अपेक्षित आहे.

Regular म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

Regular म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती वितरकामार्फत येत असते किंवा एजंट, MF distributor, बँका, वित्तीय सहायकाच्या मदतीने गुंतवणूक करत असते. Regular म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून केलेली गुंतवणुक वितरकाला कमिशन देत असते. त्याबरोबरच गुंतवणूकदारांना समोपदेशन करणे, त्यांच्या खात्याची देखभाल करणे, KYC करणे, योग्यवेळी निर्णय घेणे इत्यादी कामे Regular म्युच्युअल फंडामध्ये भूमिका घेत असतात. थोडक्यात काय, Regular म्युच्युअल फंड हा असा फंड आहे ज्यामध्ये कोणत्यातरी वितरक माध्यमातून गुंतवणूक केली जाते व त्याबदल्यात वितरकाला शुल्काच्या स्वरूपात कमिशन भेटते. हे कमिशन म्युच्युअल फंड हाऊसच्या AMC तर्फे दिले जाते ज्यामुळे Regular म्युच्युअल फंडाचा Expense Ratio थोडासा खर्चिक किंवा जास्त असतो.

 

तुम्हाला माहीत आहे का?

90 च्या दशकात UTI म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सुरू झालेले गुंतवणुकीचे पर्व 2013 पर्यंत Regular म्युच्युअल फंड म्हणून कार्यरत होते. 2013 नंतर सेबीच्या निर्देशानंतर Direct म्युच्युअल फंडाचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे Direct Regular म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.

Direct म्युच्युअल फंड म्हणजे काय?

वरती आपण पाहिले की Regular म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे मुख्य माध्यम वितरक असतात. Direct म्युच्युअल फंड प्रकारामध्ये मात्र वितराकाचा संबंध येत नाही. नावाप्रमाणेच Direct म्हणजेच थेट म्युच्युअल फंड हाऊसच्या AMC मध्ये गुंतवणूक होत असते. सर्व खात्याची देखभाल, खात्याची KYC वगैरे सर्व गोष्टी गुंतवणूकदारालाच कराव्या लागतात. जे काही पैसे म्युच्युअल फंड हाऊसमध्ये गुंतवले आहेत ते थेट गुंतवले असल्यामुळे AMC expense Ratio किंवा खर्च Regular म्युच्युअल फंडाच्या तुलनेत कमी असतो कारण इथे वितराकाची साखळी नसते.

निष्कर्ष

Regular असो किंवा Direct, म्युच्युअल फंड हाऊसचे व्यवस्थापक मंडळ योजनेच्या जोखीम क्षमतेनुसार स्टॉक आणि बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करत असते. प्रत्येक गुंतवणुकीवर मिळणारा नफा किंवा तोटा Regular आणि Direct म्युच्युअल फंडाच्या NAV वर प्रभाव पाडत असतो. NAV ही तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दर्शवत असते. म्हणून आपणाला Direct म्युच्युअल फंडाची NAV ही Regular म्युच्युअल फंडाच्या तुलनेत जास्त दिसत असते ज्याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की Regular म्युच्युअल फंडाची NAV ही वितरकाचे कमिशन कापून दाखवली जाते ज्यामुळे ती कमी असते.

Leave a Comment